(छायाचित्र – जलकोटी एकमुखी दत्त मंदिर )

Narmada Parikrama – Maaheshwar of Ahilyabai Holkar

कालच्या  रात्री माहेश्वरला पोहोचून मुक्काम केला होता. माहेश्वर म्हटल्यावर ज्या गोष्टी आठवतात त्या म्हणजे इंदोरच्या होळकर घराण्यातील लोकप्रिय राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी व माहेश्वरी साड्या. अहिल्यादेवी व नर्मदेचा फार जवळचा संबंध. त्यानी जे घाट नर्मदेच्या काठावर बांधले त्यांपैकी माहेश्वरचा घाट अतिशय सुंदर आहे. आजचे नर्मदास्नान या सुंदर घाटावरच्या स्वच्छ पाण्यात व्यवस्थित करता आले. येथे पुरुष व स्त्रियांकरिता वेगळे घाट आहेत.

माहेश्वरची खासियत म्हणजे येथील साड्या. त्याना रेवा, नर्मदा पॅटर्न अशी वेगवेगळी नावे देऊन ग्राहकांना चागलेच मोहविले जाते. येथील महाराष्ट्रीयन पवारांचे दुकान महाराष्ट्रातील ग्राहकांच्या विशेष आवडीचे. ३-४ पिढ्यांपूर्वी आलेल्या पवारांनी आता इथे चांगलाच जम बसविला आहे व या कुटुंबियांची आता “पायल” व “अभिनव हँडलूम” या नावाने इथे आणखी दोन दुकाने झाली आहेत. सर्वसंग परित्याग न करता आलेल्या नर्मदा परिक्रमार्थीना माहेश्वरच्या घाटाबरोबर या कपड्यांचा (साड्या/ड्रेस मटेरियल) चा मोह न पडला तरच नवल.

येथे जवळच जलकोटी या ठिकाणी एकमुखी दत्ताचे खुप मोठे मंदिर आहे. तेदेखील न चुकता पाहायला हवे. कदाचित भारतातील दत्ताचे हे सर्वात मोठे मंदिर असावे.

सहस्रार्जुन मंदिर
सहस्रार्जुन मंदिर

माहेश्वरचा किल्ला हे अहिल्यादेवींचे वसतीस्थान. या किल्ल्यातही अख्खं गाव वसलेलं आहे. येथेच अहिल्यादेवींचा राहता वाडा, त्यांचं सुंदर पूजाघर व त्याचबरोबर अलीकडच्या काळात उभारलेला त्यांचा पूर्णाकृती पुतळा देखिल आहे. किल्ल्यातही अनेक हातमाग व माहेश्वरी साड्यांची दुकाने चांगली देखील आहेत. वाड्याखालीच काशीविश्वेश्वराचे अप्रतिम देऊळ आहे. तर किल्ल्यावर सहस्रार्जुन मंदिर, ११ अखंड ज्योती मंदिर अशा अनेक मंदिरांचा समूह आहे. हे सगळं पाहिल्याशिवाय यात्रेकरूचे पाय येथून निघणे अशक्यच, म्हणून दिवस राखूनच माहेश्वरला भेट दयावी व अहिल्यादेवींची भक्ती डोळा भरून पहावी आणि त्यातील अंश आपल्याही उरात साठवून घ्यावेत.

काशी विश्वेश्वर मंदिर, माहेश्वर किल्ला

सायंकाळी सूर्यास्त पाहून साग्रसंगीत नर्मदा आरती केली. तोच एक व्यक्ती येऊन किनाऱ्यावर सर्वत्र पडलेला केरकचरा काढू लागला. चौकशी केल्यावर कळले की गेली कित्येक वर्षे आपले काम संपवून आल्यावर सेवाभावनेने तो हे काम करतो व मगच घरी जातो. अशीही भक्ती असते. आपल्या नर्मदामैय्येच्या स्वच्छतेची काळजी करणारी.

महागभीर नीर पुर पापधुत भूतलं
ध्वनत समस्त पातकारि दरितापदाचलम
जगल्ल्ये महाभये मृकुंडूसूनु हर्म्यदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे॥३॥

भावार्थ – तुझ्या महापुराने तू भूतलावरील समस्त पापे धुवून काढतेस. पातकांच्या राशी तू नष्ट करतेस. प्रलयकाळी मार्कंडेय ऋषींना देखील तूच आसरा दिलास.अशा हे देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलाना मी वंदन करतो.

Maaheshwar of Ahilyabai Holkar