

दुसऱ्या दिवसाचा सुरुवातीचा मोठा टप्पा होता सुमारे २०० किमी चा शहादा ते नीलकंठेश्वर. हे स्थान नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर आहे त्यामुळे आम्ही भरुचच्या खाडीपुलावर नर्मदा ओलांडली. नीलकंठेश्वर येथेही नदीकाठच्या सुंदर परिसरात शंकराचे स्थान आहे. येथेच नर्मदा समुद्राला मिळते त्या परिसरात घाटाच्या पायऱ्याही बांधलेल्या आहेत. प्रथेप्रमाणे आम्ही येथेही कलश पूजन व नर्मदा पूजन केले व सर्व समूहाने खड्या आवाजात नर्मदाष्टक वाचायला सुरुवात केली.
सबिंदु सिन्धु सुस्खल तरंग भंग रंजितम
द्विषत्सु पाप जात जात कारि वारि संयुतम
कृतान्त दूत काल भुत भीति हारि वर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे।।१।।
(भावार्थ – बिंदुरूपाने प्रकटलेली तू सिंधूपर्यंतच्या प्रवाहाने सुशोभित आहेस. दुष्ट वृत्ती , पाप या मुळे वारंवारच्या होणाऱ्या फेऱ्यांचा नाश तुझ्यामुळेच होतो. तू काल दूतांची भीती हरण करणारी आहेस. अशा हे देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलाना मी वंदन करतो).
आणि नदीच्या पाण्यात तरंग उमटू लागले. आणि सर्वजण अचंबित होऊन त्या तरंगाकडे पाहू लागले कारण ते होते नर्मदेच्या वाहनाचे – पोहत येणाऱ्या मगरीचे. ते पाहताना सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले व सर्वांनी नर्मदामातेचा जयकार केला.

यापुढचा टप्पा होता ६० किमी अंतरावरील नारेश्वर येथील रंगावधूत स्वामींचे समाधिस्थळ. गरुडेश्वरच्या टेंबे स्वामींचे हे शिष्य. यांची दत्त बावनी खूप प्रसिद्ध आहे व अनेक समस्यांवरचा रामबाण उपाय म्हणून ओळखली जाते. हे स्थळ देखील अतिशय रम्य आहे.
या सर्व सहलीत सुमारे ४० सदस्य होत्या व त्यातील ७५ टक्के स्त्रिया आहेत, त्यातील बऱ्याचशा जेष्ठ नागरिक होत्या. कुणी बहीणींबरोबर, तर कुणी मैत्रिणीबरोबर आलेल्या. काही तर एकेकट्या आल्या व इथे त्यानी मैत्रिणी तयार केल्या. या सर्वांचा समान धागा होता तो नर्मदा मैया. तिनेच आपल्याला इथे बोलावले आहे यावर यातील प्रत्येकीची गाढ श्रद्धा होती. या श्रद्धेला जोड मिळाली ती प्रभू ट्रॅव्हल्सच्याच्या अनुभवाची. त्यातूनच ही यात्रा रंगली व आम्ही उभयतानी देखील तो आनंद अनुभवला.
